वृषाली किन्हाळकरांच्या पूर्वपरिचित अशा अनेक ओळखींमध्ये एका नव्या ओळखीची छानशी भर घालणारा हा सत्तावन छोट्या ललित लेखांचा संग्रह आहे. ताज्या टवटवीत फुलांचा गुच्छच जणू! या लेखिकेच्या एकूणच व्यक्तिमत्वात, संवेदनशीलतेत, सर्जनवृत्तीत जगण्याच्या नाना कळांना सहजपणे बोलके स्पर्श करण्याची क्षमता आहे. सहजता या गुणवाचक विशेषणाला वृषाली किन्हाळकर त्यांच्या कळत-नकळतपणे एक मूल्यवाचक स्वधर्म बनवतात. लेखिका प्रसूतिशास्त्र व स्त्रीरोग तज्ञ आहेत, म्हणजे त्या मानवी देहाच्या आणि मनाच्याही व्यथा-व्याधींच्या निवारणार्थ काम करतात. त्यातही स्त्रियांच्या! मनुष्याच्या व्याधी-आधी-व्यथा-वेदना आणि कवयित्री आणि वृषाली किन्हाळकर...! ललित साहित्य निर्मितीला अशा त्रिवेणी संगमापेक्षा अधिक प्रवाही ‘कॉम्बो’ दुसरा कोणता असू शकेल? सहजता, संवाद व साक्षेप म्हणजे निकोप आधुनिक जीवनशॆली. ‘सहजरंग’ हे अशा शॆलीचा नमुना होय. - रा. ग. जाधव
please login to review product
no review added