गेली जवळजवळ पन्नास वर्षे मधु मंगेश कर्णिक हे सातत्याने कथालेखन करीत आहेत. १९५१ साली त्यांची पहिली कथा 'कृष्णाची राधा' ही प्रकाशित झाली. तेव्हापासून आजता गायत त्यांचे कथालेखन चालू आहे. या दरम्यान मराठी कथेने अनेक टप्पे ओलांडले, वळणे घेतली आणि नवनवीन रूपे धारण केली. मधु मंगेश कर्णिक यांची कथा या साऱ्या परिवर्तनाला साक्षी आहे. स्वतःच्या मनोपिंडाशी, सृजनकलेशी प्रामाणिक राहून कर्णिकांनी या परिवर्तनाचे जेवढे पदर स्वीकारता येतील, तेवढे सहजतेने स्वीकारले. १९५८ साली प्रसिद्ध झालेल्या, 'कोकणी ग वस्तीऽऽ' या पहिल्याच कथासंग्रहाने त्यांनी वाचकांच्या मनामध्ये स्थान पटकावले. त्या मानाच्या जागेवरून ते या घटकेपर्यंत दूर झालेले नाहीत. मराठी कथेच्या विशाल प्रदेशामध्ये मधु मंगेश कर्णिक यांची कथा स्वत:च्या वैशिष्ट्यानिशी आजही ठळकपणे वावरताना दिसून येते. ती स्वत:शी जेवढी प्रामाणिक आहे; तेवढीच ती आपल्या वाचकांशीही. कर्णिकांना 'लोकप्रिय कथाकार' ही पदवी आपोआपच प्राप्त झाली. आजवर प्रसिद्ध झालेल्या अडतीस कथासंग्रहांतून आठशेच्यावर कथा त्यांनी वाचकांना दिल्या. आणि आपले वाचकांबरोबरचे हस्तांदोलन दृढ केले.'पांघरूण' हा कथासंग्रह मधु मंगेश कर्णिकांच्या लेखनाची सर्व वैशिष्ट्ये अधोरेखित करतो.
please login to review product
no review added