एक गोष्ट सांगणाऱ्या साध्या रचनेला, गहन जीवनाशयाचे परिणाम कसे प्राप्त होते याचा प्रत्यय, विजया राजाधक्ष्य यांच्या या कथासंग्रहात विशेषत्वाने येतो. या कथेच्या केंद्रस्थानी, वेगवेगळ्या पिढ्यांतील "स्त्री" आहे. तिचे घर परिसर , कार्यक्षेत्र, नातीगोती व ताणताणाव यांचे कथन आहे. या चित्रणाला, बदलत्या कौटुंबिक व सामाजिक वातावरणाचा संदर्भ असला तरी, 'स्त्री' च्या आंतरिक जगण्याला असलेले प्राधान्य हे त्यांचे वैशिष्ट आहे. विकल करणाऱ्या एकटेपणाला सामोरे जात स्वतःच्याच सोबतीतील गाढ तृप्ती अनुभवणाऱ्या समर्थ 'स्त्री' चे दर्शन त्यातून घडते. जन्म - मृत्यू, श्रद्धा - अश्रद्धा, न्याय-अन्याय, साफल्य-वैफल्य यांच्यातील गुंतागुंतीचे भान ठेवत; मानवी अस्थित्व, संस्कृती व मूल्यविचार या अनेकविध संदर्भातील स्वत्वाचा शोध हे या कथेचे बलस्थान आहे. मोजक्या, अर्थपूर्ण प्रतिमांमुळे, कथेला चिंतनाचा अंतःप्रवाह लाभलेला आहे. नित्यनुतन असणाऱ्या जीवनाकडे पाहण्याच्या विविध दृष्टी त्यातून सूचित झाल्या आहेत. म्हणूनच, (कथानिर्मितीचे अर्धशतक पार करणाऱ्या) विजया राजाधक्ष्य यांचा समांतर हा नवा संग्रह म्हणजे त्यांच्या परिपक्व प्रतिभाशक्तीचा संपन्न अविष्कार होय असे म्हणावेसे वाटते. - मीना गोखले
please login to review product
no review added