एकटी असले की आताशा कोण कधी समोर येऊन ठाकले सांगता येत नाही. कधी बोरकरांनी पाठवलेले गडद निळे गडद निळे जलद भरभरून येतात आणि आकाश धुऊन स्वच्छ करतात. दिवस सोनेरी होतो आणि रात्र रुपेरी. सर्वदूर नक्षत्रांची रांगोळीच रांगोळी. धामापूरच्या आजीच्या बागेतल्या फुलांचा दरवळ घेऊन आलेली हसरी ओलसर नक्षत्रं. पळसखेडच्या दिशेने पक्ष्यांचे लक्ष थवे येतात आणि त्यांतलं एखादं वेल्हाळ पाखरू गात गात माझ्या झाडावर उतरतं. चोहूकडून नातवंडं येऊन बिलगतात आणि ’गोष्ट सांग’ म्हणून चिवचिवाट करतात. ...हे सगळं किती लोभसवाणं आहे! मग माझ्याच पापण्यांत पुन्हा पुन्हा हे असं धुकं कां जमा होतंय?’ आहे मनोहर तरी गमते उदास’ अशी ही मनाची अवस्था झाली असताना या पाखरांना मी गोष्ट तरी कोणती सांगू? एक होता राजा आणि एक होती... (एक कोण होती?) ...आणि एक होती परी की एक होती म्हातारी? की... (दुसरं कुणी नव्हतंच?) फक्त ...एक होती परी आणि ती झाली म्हातारी? ..... .... सफळ संपूर्ण व्हायला ही साठा उत्तरांची कहाणी नाहीच. ही साठा प्रश्नांची कहाणी. सफळही नव्हे आणि निष्फळही नव्हे. अपूर्ण मात्र नक्कीच.
please login to review product
no review added