श्री अरविंदाची चरित्रकथा हे इहलोकीचे एक नवल आहे. भूतकाळात घडलेले, वर्तमानाच्या सीमेला येऊन भिडलेले व भविष्याबरोबर विस्तार पावणारे श्री अरविंदाचे दिव्य जीवन हा अनेकांच्या उपासनेचा विषय झाला आहे. श्री अरविंद हे एक व्यक्तिमत्व राहिले नाही. मानवकुलाचे भवितव्य घडविणारे ते एक दर्शन झाले आहे. श्री अरविंदांच्या वचनावर विश्वास ठेऊन भवसागर तरून जाण्याचा निर्धार करणार्या भक्तिभाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. सर्वसंगपरित्यागाची वार्ता न करता अखिल जीवन हाच एक योगमार्ग समजून, इहलोकीच वॆकुंठाचा प्रासाद उभा करण्याच्या निश्चयाने कटिबद्ध झालेले श्री अरविंदांचे अनुयायी जगभर विखुरलेले आहेत. ते विज्ञानाचे अभ्यासक आहेत. संस्कृतीचे उपासक आहेत. साहित्याचे जाणकार आहेत. हटाहटाने जटा राखून मठाची उठाठेव करणारे महंत त्यांच्यात कोणीच नाहीत. त्यात सर्वसामान्य संसारी आहेत, परमविरक्त तापसी आहेत, अध्यापक-प्राध्यापक, वकिल, डॉक्टर व संशोधक असे नाना प्रकारचे व प्रकृतीचे लोक आहेत. प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे आहे. पण सर्वांची श्रध्दा समान आहे. मानवजातीचे उत्थान हेच सर्वांचे स्वप्न आहे.
please login to review product
no review added