सावित्रीबाई फुले या स्त्रीबद्दल आम्हा सर्व स्त्रियांना अपार आदर वाटतो. त्या तेव्हा होत्या म्हणून आज आम्ही आहोत. सावित्रीबाई, आनंदीबाई जोशी, ताराबाई मोडक, कमलाबाई होस्पेट, अनुताई वाघ किती नंदादीप उजळले आणि आमचे शिकणे सोपे झाले. अशा 15 स्त्रियांच्या कर्तुत्वाचा आलेख त्यांच्या शब्दात मांडण्याचा एक आगळावेगळा प्रसन्न उपक्रम म्हणजे "उजळले स्मृतीचे दिवे" हे नितांत सुंदर पुस्तक. त्या स्त्रिया स्वतःच आपल्याशी बोलत असल्याने यात मृत्यू नाही. आहे ते जिचे तिचे बोलके काम. " सारा कर्तुत्वाचा बहर, सारा जाणिवांचा मोहर, हा तर स्त्रीत्वाचा फुल्लोर, पोचली आकाशी गल्लोर. जमिनीवर पाय ठेवून आकाशाला भिडणाऱ्या या स्त्रियांना बोलकं करणारी स्त्री ही तेवढीच मातब्बर. मुक्ता कणेकर या ज्येष्ठ साहित्यिका जेव्हा या "आसमानी" शब्दचित्रांना बोलकं करतात, तेव्हा शब्दप्रवास कर्तुत्वाइतकाच लखलखित होतो. मुक्ता कणेकर माझ्या अतिशय आवडत्या लेखिका आहेत. मी जे लिहीत आहे त्यात इवलीशीही अतिशयोक्ती नाही. पुस्तक एकदा हाती घ्याल तर ते वाचल्याशिवाय खाली ठेवणार नाही. एवढी मी खात्री देते. माझेही तसेच झाले बरं! डॉ. विजया वाड.
please login to review product
no review added