कोरोनासारख्या संसर्गजन्य साथीच्या आजाराने उद्भवलेल्या भयकारी अस्वस्थ वर्तमानाचा कालपट ज्ञानेश्वर जाधवर यांच्या लॉकडाऊन या कादंबरीतून साकारला आहे. पुण्यातील एक तरुण इंजिनियर आपल्या कुटुंबाला मोटारसायकलवर घेऊन आकांतभयाने गावाकडे निघाला आहे. वाटेत त्याला पोलीस तपासणीसाठी ताब्यात घेतात आणि त्याच्या परवडीला सुरुवात होते. यातच विलगीकरणाच्या त्रासदीबरोबर कोरोनाकक्षात त्याच्या पत्नीचा मृत्यू होतो. त्यामुळे या कुटुंब कहाणीचित्रणाला शोकात्मिकतेचे परिमाण प्राप्त झाले आहे. पन्नासेक दिवसांच्या लॉकडाऊन काळातील घडामोंडीनी कादंबरीला आकार प्राप्त झाला आहे.कुटुंबकहाणी वाटणाऱ्या या कादंबरीतून समकालीन कोरोनाकाळाचे अनेकमिती दर्शन घडविले आहे. कुटुंबाचा परवडपरीघ ओलांडून ती विस्तृत आणि व्यापक झाली आहे. महामारी संकटकाळाचे समाजवाचन या कादंबरीत आहे. सामान्य माणसे, स्थलांतरितांचे जग, मध्यमवर्ग, प्रशासन व वैद्यकीय व्यवस्थेचे विविध तऱ्हेचे चित्रण कादंबरीत आहे. एका बाजूला राज्यसंस्थेचा दिशाहीन कार्यक्रम (मेणबत्ती, थाळीवादन) तसेच पोलीस प्रशासन व आरोग्य यंत्रणा हस्तक्षेपाच्या जीवघेण्या असुरक्षितकाळाचे चित्रण कादंबरीत आहे. विलगीकरण - कोरोनाकक्षापासून स्मशानभूमी पर्यंतच्या घडामोडींचे समाजकथन त्यामधून आकाराला आले आहे. सार्वत्रिक असे मृत्यूभय आणि आकाराला आलेल्या व्यवस्थेच्या ताणतणावातून कादंबरी घडली आहे. अस्वस्थकाळातील समाजवृत्तांताबरोबरच नायकाच्या मनातील गावभूतकाळ आणि भयस्वप्नांचा प्रतिकात्म पट कादंबरीत आहे. विविध प्रकारची अनुभवक्षेत्रे, संवादचर्चा, घटना-घडामोडींच्या अनुभवचित्रांमुळे या कथनाला अनेक आवाजीपण प्राप्त झाले आहे. कोरोनाकाळाचा विविध दर्शनीबिंदूचा आरसा दाखवणारी ही कादंबरी समकालीन जीवनाचा दस्तऐवज ठरू शकेल.
please login to review product
no review added